विकासकामात दिरंगाई खपवून घेणार नाही : खा.अशोक नेते व आ. बंटी भांगडिया यांचे प्रशासनास निर्देश

83

– केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दिल्या सूचना

गडचिरोली : केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व शेतकरी वर्गापर्यन्त पोहचत नाही याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी, कर्मचारी असून कामात हयगय केल्यामुळेच शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन विकास कामात कुचराई न करता कामे व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी अन्यथा खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार अशोक नेते व आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी तालुका प्रशासनास दिला. नागभीड पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश देताना ते बोलत होते. आज २६ नोव्हेंबरला गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते व आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभागृह नागभीड येथे महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत नागभीड शहर व तालुक्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर भर देत चर्चा करून त्यासंबंधित उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुरकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, पं. स. सभापती नागभीड प्रफुलभाऊ खापर्डे, उपसभापती रागिनी गुरपुडे, नगराध्यक्ष न. प. नागभीड उमाजी हिरे, न. प. चे उपाध्यक्ष गणेशभाऊ तर्वेकर, न. प. चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, ईश्वर मेश्राम, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा श्रीमती इंदूताई आंबोरकर, तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी व भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.