भगवान बिरसा मुंडा यांच्या लढ्यामुळे आदिवासींना मिळाली अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा : घनश्याम मडावी

125

– आदिवासी विकास परिषद व जंगल संस्थांच्या वतीने बिरसा मुंडा जयंती साजरी

गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करून इंग्रजांच्या आधुनिक हत्यारांचा आदिवासी समाजाच्या पारंपरिक हत्यारांनी लढा दिला होता. त्यांच्या लढ्यामुळेच आगामी काळात आदिवासी समाजाला अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली, असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ उपाध्यक्ष आदिवासी सेवक घनश्याम मडावी यांनी केले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व जंगल संस्थांच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जंगल कामगार सहकारी संस्थेच्या धानोरा मार्गावरील दलितमित्र लहुजी मडावी सभागृहात भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मडावी पुढे म्हणाले, आदिवासी समाजाला इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात संघटित करून त्यांना उलगुलानचा मंत्र देणारे बिरसा मुंडा जननायक होते. तत्कालीन परिस्थितीत इंग्रजांनी राबविलेले धर्मांतरण, शोषण व अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला. त्यांचा लढा भावी पिढीने आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, असेही मडावी म्हणाले. यावेळी घनश्याम मडावी व इतर मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला बोलली जंकास संस्थेचे अध्यक्ष रा. सी. सुरपाम, खुटगाव जंकासचे सचिव तथा जिल्हा संघाचे पर्यवेक्षक डी. एस. सुरपाम, गडचिरोली जंकासचे सचिव सचिन मेश्राम, लिपीक गुरुदेव नैताम, बोलली संस्थेचे संचालक ग. मा. मोहिले, गडचिरोली संस्थेचे मधुकर कन्नाके, खुटगाव जंकासचे संगणक लिपीक तेजेश्वर नेवारे, सचिन आत्राम, बोदली संस्थेचे लिपीक पुंजीराम राऊत, गडचिरोली नगर परिषदेच्या माजी शिक्षण सभापती वर्षाताई शेडमाके, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.