8 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 127 आदिवासी जोडपी होणार विवाहबद्ध

52

– गडचिरोलीत 26 मार्चला होणार भव्य सामूहिक विवाह सोहळा

– गडचिरोली जिल्हा पोलिस दल व मैत्री संस्थेचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली पोलिस दल, पोलिस दादालोरा खिडकी आणि मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या, 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता स्थानिक चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यात 8 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 127 आदिवासी युवक-युवती विवाहबद्ध होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली. या पत्ररपरिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल व मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मैत्री परिवार संस्था ही मागील दीड दशकापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे. मैत्री परिवाराने गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असून पोलिस विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागात दीपावली सण साजरा करण्यासोबतच कपडे वाटप, वैद्यकीय शिबिर, शैक्षणिक उपक्रम, रोजगार मेळावे राबविले जातात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने व नक्षलवादामुळे भयग्रस्त या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, दहशतमुक्त व हिंसामुक्त समाज निर्माण करण्याच्या हेतुने 2018 साली पहिल्यांदा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी
नागपूर व अहेरी येथे प्रत्येकी एक व गडचिरोली येथे दोन सामूहिक विवाह सोहळे घेण्यात आले. त्यात आतापर्यंत 15 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांसह 433 आदिवासी युवक- युवतींचे विवाह पार पडले.
येत्या, 26 मार्च 2023 रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या या पाचव्या सामूहिक विवाह सोहळ्याला गडचिरोली व नागपूर येथील अनेक मान्यवर, गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी आणि मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वधू-वरांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन गडचिरोली पोलिस दल व मैत्री परिवार संस्थेने केले आहे.