कर्तबगार महिलांचा स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने सन्मानचिन्ह देऊन गौरव करणार

76

– भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही अनेक महिला स्वकर्तुत्वाने व निरंतर परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालन पोषण व मुलांचे संगोपन करून त्यांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या कार्याची कुठेही दखल घेतल्या जात नाही व निराधार महिलांना योग्य तो सन्मान दिल्या जात नाही याची जाण ठेवून भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारिणीने अशा कर्तबगार व होतकरू महिलांचा स्वर्गीय सुषमा स्वराज जी यांच्या नावाने स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतला असून त्या निर्देशानुसार आपण भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी या नात्याने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कार्यक्रम राबवून जिल्ह्यातील निराधार, विधवा, होतकरू व विविध क्षेत्रात कल्याणकारी काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करणार असल्याचे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. मुुलचेरा येथे आयोजित देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज सन्मानचिन्ह वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा प्रभारी तथा गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या पुढाकारातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मूलचेरा येथील स्वामी विवेकानंद छात्रावास येथे महिला मेळावा व स्वकर्तुत्वाने व परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तबगार व होतकरू महिलांचा सन्मान कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याच्या प्रभारी वनिताताई कानडे, जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे महिला तालुका अध्यक्ष प्रभाती भक्त, उपाध्यक्ष वनिता सरकार यांच्या हस्ते मोलमजुरी, शेतात काम करून भाजीपाला विक्री करून कुटुंब सांभाळणाऱ्या व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तृत्ववान स्त्री शक्तींना स्व. सुषमा स्वराज जी यांच्या नावाने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सचिव सुभाष गणपती, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, मुलचेरा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रभातीताई भक्त, तालुका उपाध्यक्ष वनिता सरकार, विवेकानंदपूरच्या ग्रा. पं. सदस्या कविता उईके, संगीता मडावी, ज्योती सोनुले, महिला आघाडी गडचिरोलीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.