कॅपॅसिटरचा वापर कृषिपंपधारकांनी करावा : महावितरणचे आवाहन

56

– वीजेच्या योग्य दाबासाठी व वीजयंत्रणेच्या सुरक्षेसाठी कृषिपंपांवर कॅपॅसिटरचा वापर महत्वाचा

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : वीज (electric) ही आज चौथी प्राथमिक गरज बनली आहे. वीजेचा वापरही त्याप्रमाणात वाढला आहे. १४ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान सर्वत्र ऊर्जा संवर्धन आठवडा पाळण्यात येतो व उर्जाबचतीच्या विविध पर्यांयावर यादरम्यान विविध कार्यक्रम राबविले जातात. वीजनिर्मितीसाठी आजही मोठया प्रमाणात औष्णिक वीजप्रकल्पावर विजनिर्मितीसाठी अवलंबून राहावे लागते यात कोळसा, पाणी या नैसर्गिक संसाधनांचा वापर मोठया प्रमाणात होतो. त्यामुळे वीजेचा वापर बचतपुर्वक केल्यास वीजबिलही कमी येणार शिावाय नैसर्गिक संसांधनांचा वापर कमी होवून पुढच्या पिढीसाठी आपण त्यांची बचत करुन ठेवू शकतो.

एक युनिट वीजेची बचत म्हणजे दोन युनिट वीजेची निर्मीती म्हणूनच म्हटल्या जाते. परंतु आज, पूर्वीच्या तुलनेत आपल्या अनेक गरजा व दैनंदिन कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत ही वस्तुस्थिती आहे. कृषिपंपाच्या बाबतीत विचार केल्यास कॅपॅसिटरचा वापर वीजेचा भार वाचविणे, वीजयंत्रणेवार ताण न येणे, योग्य दाबाचा वीजपुरवठा होण्यास मदत मिळते व परिणामी वीजयंत्रणा सुरळीत राहते.

महावितरण चंद्रपूर परिमंडळांतर्गत कृषिपंपधारकांना योग्य दाबाचा व व्यवस्थित वीजपुरवठा मिळून रोहित्रांवार ज्यादा भार न येता त्यांच्या नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होण्यास कॅपॅसिटरचा वापर कृषिपंपधारकांनी करण्याचे तसेच, मंजूर भाराच्या प्रमाणतच मंजुर क्षमतेचे कृषिपंप वापरण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाद्वारे करण्यात येत आहे.
बऱ्याच कृषिपंपांना कॅपॅसिटर लावलेले आढळून येत नाही. तरी प्रत्येक कृषिपंपांना नामांकित कंपनीचे कॅपॅसिटर लावण्यात यावे. कृषिपंपावर कॅपॅसिटर बसविल्याने योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर लावल्याने कृषिपंपास योग्य दाबाचा विद्युत पुरवठा मिळून कृषिपंपांचे आयुष्य वाढून ते योग्य प्रकारे काम करते.
कृषिपंपाला कॅपॅसिटर लावल्यामुळे वीजकंरट भार कमी होतो. कृषिपंपाला योग्य दाबाने विदयुतपुरवठा करण्यास मदत होते. रोहित्रावरील वीजभार कमी झाल्यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होते. कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते तसेच विजयंत्रणेमध्ये योग्य दाब राखल्या गेल्यामुळे वितरण हानी कमी होते तसेच कृषिपंपाचे वीजबिल कमी होण्यासही मदत होते.
कॅपॅसिटरचा वापर करून कृषिपंपधारकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी आवाहन केले आहे.