विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने यावर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात 75 किलोमिटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी कार्यकर्त्यांना मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आज शनिवारी येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पदयात्रेची सुरुवात कुरखेडा येथून करण्यात येणार असून जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मार्गक्रमण करणार आहे. या पदयात्रेदरम्यान गावागावात सभा घेण्यात येणार आहेत. ही पदयात्रा 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून ते 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन या कालावधीत काढली जाणार असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.
मागील आठ वर्षांपासून देशात वाढलेली महागाई, वाढत्या महागाईच्या संघर्षाला बगल देण्याचा भाजपाचा प्रयत्न, ईडीची कारवाई करून दडपशाहीचे भाजपाच्या धोरणाचा पर्दाफाश पदयात्रेदरम्यान गावागावात आयोजित सभांमध्ये करण्यात येणार असल्याचेही महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले आहे.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असून काँग्रेस कार्यकर्त्यांचे यात मोठे योगदान आहे. काँग्रेसने देशात क्रांती आणण्याचे काम केले आहे. हे कार्य पदयात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. या पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. किरसान यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, डी. डी. सोनटक्के, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, सुनील चडगुलवार, अनिल कोठारे, भैय्याजी मुद्दमवार आदींची उपस्थिती होती.