संपूर्ण महाराष्ट्रातील निराधारांचे मानधन देण्यासाठी मायनस बीडीएस पद्धतीला परवानगी द्या : आमदार डॉ. देवरावजी होळी

83

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना निवेदनाद्वारे विनंती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील विधवा परितक्त्या भगिनी, अपंग, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सरकारकडून देण्यात येणारे मासिक मानधन मागील ६ महिन्यांपासून मिळाले नसून प्रत्येक वेळेस असेच होत असल्याने अशा निराधार लोकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्यामुळे या निराधारांना मायनस(-) बीडीएसच्या प्रणालीद्वारे मानधन देण्यासाठी परवानगी दिल्यास त्यांना दर महिन्याला वेळेवर मानधन मिळू शकेल. त्यामुळे या प्रणालीला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
ना. देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री व सुधीरभाऊ मुनघंटीवार अर्थमंत्री असताना या प्रणालीच्या माध्यमातून अशा निराधारांचे मानधन देण्यात येत होते. त्यामुळे दर महिन्याला त्यांचे मानधन योग्य वेळेवर मिळत होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्या प्रणालीचा वापर करणे बंद करण्यात आले परिणामी या निराधारांना आपल्या मासिक मानधनाकरिता ६-६ महिने वाट पहावी लागते. अतिशय निराधार निराश्रीत असलेल्या या निराधारांना दर महिन्याला आवश्यक असलेले मानधन ६-६ महिने मिळत नसल्याने त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा निराधारांचा विचार करणे आवश्यक असून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या सरकारमध्ये लवकरच याबाबत निर्णय घेऊन अशा निराधारांना आधार द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या मागणीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवित तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश प्रधान सचिव यांना दिले.