बेमुदत ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारली : सुरजागडचा मुद्दा पुन्हा चर्चेत

157

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण लोहखाणी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वात आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला गडचिरोली तहसीलदारांनी परवानगी नाकारल्याने सुरजागड लोह खाणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सदर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, भाई शामसुंदर उराडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, तहसीलदार गडचिरोली यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला कोविडच्या कारणाने परवानगी नाकारली. सदर परवानगी मिळण्यासाठी भाई देवेंद्र चिमनकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील अर्ज दाखल केले आहे.

जिल्हाभरात विविध राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जात असताना कोविडचे हास्यास्पद कारण देवून आंदोलनाला परवानगी नाकारल्याची बाब पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील सोमवारी सभागृहाच्या लक्षात आणून देणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली आहे. तसेच सदर प्रकार खदान माफियांच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याचा आरोप केला असून डाव्या पक्षांसोबत दुजाभाव करीत असल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, भाई शामसुंदर उराडे, देवेंद्र चिमनकर यांनी दिला आहे.