पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पडले गडचिरोली महोत्सवाचे उद्घाटन

133

– गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अनोखा उपक्रम

– दोन दिवस रंगणार रेला नृत्य स्पर्धा व व्हालीबॉल स्पर्धा

– महोत्सवातील विविध स्टॉलमधून वस्तुंची मेजवानी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशिल व आदिवासीबहुल असून येथील आदिवासी नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्ययाकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त नागरिकांना विविध योजना मिळवून देत विकासाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याचे उद्देशाने 1/0/2022 ते 2/3/2022 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातुन जिल्ह्रात पहील्यांदाच “भव्य गडचिरोली महोत्सवाचे” आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाचे प्रांगणात करण्यात आले आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन ना. एकनाथजी शिंदे, नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) तथा पालकमत्री गडचिरोली जिल्हा यांच्या हस्ते पार पडले.
गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेला भव्य गडचिरोली महोत्सव दोन दिवस चालणार असून या महोत्सवाचे विशेष आकर्षण आदिवासी समुह नृत्य स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा असुन दुर्गम व अतिदुर्गम भागातुन आलेल्या संघामध्ये हया स्पर्धा अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. तसेच गडचिरोली जिल्हयातील विविध बचत गट तसेच संस्थांनी आपले उत्पादनाचे व विविध वस्तुंचे स्टॉल लावलेले आहेत. यासोबतच विविध हस्तकलेच्या वस्तुंचे स्टॉल उपस्थित नागरिकांना पहावयास मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री एकनाथजी शिदे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गडचिरोली पोलीस दलाचे वतीने जिल्हयात पहील्यांदाच गडचिरोली महोत्सव प्रारंभ होत असल्याबाबतची घोषणा करुन, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली महोत्सवाकरिता अथक परीश्रम घेत असलेले पोलीस अधीक्षक अंकित गोयल तसेच त्यांच्या टीमचे मनपुर्वक व भरभरुन कौतुक केले. अशाच प्रकारे गडचिरोली पोलीस दलाचे वतीने गडचिरोली महोत्सव दरवर्षी आयोजित करावे. यामधून दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरीकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमातुन गडचिरोलीतील युवक-युवतींना एक व्यासपीठ उपलब्ध होवुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे सांगुन, गडचिरोली जिल्हयातील खेळाडुंकरीता विविध खेळाच्या साहित्यांसह सरावाकरीता क्रिडा संकुल उभारले जाणार आहे. त्या माध्यमातुन क्रिडा क्षेत्रातील खेळाडु तरुण-तरुणींना उच्च पातळीवर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळु शकेल असे सांंगितले. यावेळी एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणाकरीता मिरज व मुंबई येथील महाविद्यालयात निवड झालेल्या 1) सुरज पुंगाटी व 2) विजय ओक्सा या गडचिरोली जिल्हयातील रहीवासी असलेल्या आदिवासी विद्याथ्र्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रु.ची मदत देवुन गौरविण्यात आले.
सदर गडचिरोली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अजय कंकडालवार, अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परीक्षेत्र कॅम्प नागपूर संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे हे उपस्थित होते.