हक्क आणि अधिकारांसाठी कायद्यांचा अभ्यास आवश्यक : सैनू गोटा

94

– आरमोरी येथे पार पडली तीन दिवशीय ‘व्यवस्था शिक्षण’ कार्यशाळा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अनुसूचित क्षेत्रातील नागरिकांचे हक्क आणि अधिकार अबाधित राखून घटनात्मक तरतुदीनुसार ग्रामसभांनी मालकी गाजवायची असेल तर त्यासाठी कायद्यांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्यासाठीच गाव गणराज्य ग्रामसभा परिषदेच्या वतीने व्यवस्था शिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून जिल्हाभरातील ग्रामसभांच्या नविन कार्यकर्त्यांसाठी निरंतरपणे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा ग्रामसभांच्या युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन सैनुजी गोटा यांनी यावेळी केले.

गाव गणराज्य ग्रामसभा परिषद गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथील मारकवार फार्म हाऊसवर २८ ते ३० जानेवारी २०२२ दरम्यान तीन दिवशीय “व्यवस्था शिक्षण कार्यशाळा” आयोजित करण्यात आलेली होती.
या कार्यशाळेत स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आदिवासींचा संघर्ष, अनुसूचित क्षेत्राकरिताच्या संविधानीक तरतुदी, पाचवी अनुसूची, पेसा कायदा १९९६, ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ५४, पेसा नियम २०१४ याबाबत भाई रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. वृक्षवल्ली वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने, दिपक सोनकुसरे यांनी सापांची ओळख याविषयी तर जंगलावरचा उद्योग आणि रोजगार याविषयी अमोल मारकवार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामसभांचे युवक-युवती सहभागी झाले होते.
कार्यशाळेच्या समारोपीय सत्राला सुरजागड पारंपारिक इलाख्याचे प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य सैनुजी गोटा, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व वृक्षवल्ली वन्यजीव संस्थेचे देवानंद दुमाने, दिपक सोनकुसरे, प्रहारचे निखिल धार्मिक, मनसेचे रंजित बनकर, युवारंग क्लबचे राहुल जुवारे, दिपक गोंधळे, पत्रकार चक्रधर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.