सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दामोधर मंडलवार यांचा महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्कार

180

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जनसामान्यात आपली ओळख निर्माण करणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी तथा गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामोधर मंडलवार हे सेवानिवृत्त झाल्याने गडचिरोली महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा काल, १६ जानेवारी रोजी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
सत्कार कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, पोलीस सेवेत कार्यरत असताना पोलीस निरीक्षक दामोधर मंडलवार यांनी एक कर्तव्यदक्ष ओळख निर्माण केली होती. गरीब – श्रीमंत असा भेदभाव न करता एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून आपली भूमिका पार पाडली. जनतेमध्ये पोलीस प्रशासनाप्रती विश्वास निर्माण करून आदराचे स्थान निर्माण केले. त्यांनी समाजकार्यात सुध्दा आपल्या कार्याचा ठसा उमटविला. विविध धर्माच्या सण, उत्सवाच्या काळात गडचिरोली शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मंडलवार यांच्याप्रती गडचिरोली वासीयांमध्ये आदराचे स्थान आहे. एकप्रकारे त्यांचे सेवा कार्य सर्वधर्मसमभावनेचे प्रतिक म्हणावे लागेल, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्कप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. त्यांनी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दामोधर मंडलवार यांच्या सेवा कार्याचा गौरव केला.
सत्काराप्रसंगी जिल्हा काँँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले की, शासकीय सेवेतील पोलीस सेवा कणखर सेवा आहे. पोलीस प्रशासन हे चोवीस तास जनतेच्या संरक्षणासाठी सज्ज असते. अवैधंधंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालणे, अन्याय व अत्याचारापासून महिलांचे संरक्षण करणे तसेच सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे कार्य पोलीस प्रशासनला करावे लागते. दामोधर मंडलवार यांनी आपल्या सेवा काळात गडचिरोली शहर नव्हे तर जिल्हयाच्या इतर ठिकाणी सुध्दा एक पोलीस अधिकारी अधिकारी म्हणून आपल्या कार्याची छाप पाडली. पोलीस सेवेत उत्तम सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर मंडलवार यांनी समाजसेवेसाठी योगदान देऊन आपल्या अनुभव, गुणांचा उपयोग गोरगरिबांच्या कल्याणासाठी करावा, असे महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना दामोधर मंडलवार म्हणाले की, मी याच भागातील रहिवाशी असल्याने आपल्या सेवाकाळात नागरिकांशी नाळ जोडताना कोणत्याही अडचणी आल्या नाही. सेवा देताना जनतेने सुध्दा आपल्याला सहकार्य केले. त्यामुळे कोणतीही समस्या, तक्रारी असोत त्या निष्ठनेने सोडवून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ही माझ्या पोलीस सेवा कार्याची पावती असून आता शासकीय सेवेत नसलो तरी एक जनसेवक म्हणून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहिन, असे मंडलवार म्हणाले.

सत्कार कार्यक्रमाप्रसंगी काँँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतिश विधाते, डाॅ. नितीन कोडवते, संजय निखारे, रजनिकांत मोटघरे, वामन सावासाकडे, दिलीप गडपल्लीवार, गुणवंत नैताम, प्रफुल बिजवे, घनश्याम वाढई आदी उपस्थित होते.