दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलन उत्साहात

118

– विविध पुस्तकांचे प्रकाशन व परिसंवादाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर येेथील आद्यकवी मुुकूंंदराज साहित्य नगरीत झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्या वतीने झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक संशोधक महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य मंडळ शाखा मुर्झाच्या सौजन्याने २५ व २६ डिसेंबर रोजी दोन दिवसीय २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

या संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, संमेलनाध्यक्ष डॉ. संजयकुमार निंबेकर, प्रमुख अतिथी डॉ. हरिश्चंद्र बोरकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार मधुकर कुकडे, अधिष्ठाता दत्तात्रय वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार, कवी नाटककार डॉ. सुरेश खोब्रागडे, कवी डॉ. गिरीश सपाटे, वामनराव गोंधळे, मुरलीधर दखणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष डॉ. निंबेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, झाडीबोलीच्या चळवळीचे झाडीपट्टीला समृद्ध करण्याचे काम केले. त्यातून अनेक लेखक व कवी निर्माण  झालेले आहेत. झाडीबोलीच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करून डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या सक्षमीकरणाचा वारसा पुढे नेण्याची गरज वर्तवली. यावेळी अनेक पुस्तकांचे प्रकाशन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी पुस्तकपोहा अर्थात ग्रंथदिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मावळते अध्यक्ष गुरुप्रसाद पाखमोडे यांनी युवकांनी झाडीबोलीची धुरा सांभाळण्यास पुढे यावे, असे आवाहन केले.

२६ डिसेंबरला स्वर्गीय रामचंद्र डोंगरवार गुरुजी या साहित्यिकाच्या नावे सकाळचे कवी संमेलन पार पडले. याप्रसंगी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांची कन्या तारका रुखमोडे व इंदिरा कापगते व नात पिंकी झोडे ह्या उपस्थित होत्या. तारका रुखमोडे यांनी बाबांना दिवंगत होऊन अठरा वर्ष झालीत तरीही बाबांच्या नावाला कविसंमेलनात मानाचे स्थान देण्यात येते ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे व यावरून झाडीबोली च्या सक्षमीकरणाच्या कार्यात बाबांचं  किती मोठं योगदान असेल याची प्रचिती मला आली असे भाव व्यक्त करत, झाडीबोली भाषेत ‘कष्टाचे चीज’ या काव्याचं सादरीकरण केलं.

याप्रसंगी व्यासपीठावरील संमेलनाध्यक्ष अंजनाबाई खुणे यांनी शेतकऱ्यांचे दुःख मांडले. प्रत्येक स्त्रीने जास्तीत जास्त लेखन करणे गरजेचे आहे असे मत अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. लक्ष्मण सिंह कटरे यांनी जर आसामी नि कोकणी बोलीला लिपी नसतानाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकते तर झाडीबोलीला का नाही? तसे साहित्य यात निर्माण झालं पाहिजे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खुशाल झोडे यांनी केले.