निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा :अजय कंकडालवार

71

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली. ३० जून : रस्त्याचे काम करताना तांत्रिकदृष्ट्या ते योग्य असेल तरच ते टिकाऊ बनते. पण अनेक वेळा त्याकडे दुर्लक्ष करून कसेतरी काम उरकून बिल काढण्याला प्राधान्य दिले जाते. असाच काहीसा प्रकार तानबोडी ते बोटलाचेरू मार्गाच्या डांबरीकरण कामात सुरू असून निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधकाम करणाऱ्या संबधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी केली आहे.

यात चक्क खालून माती आणि वरून डांबरीकरण असा प्रकार सुरू असल्याने हा रस्ता किती दिवस टिकेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून केले जात असल्याचे समजते. पण काम कधी आणि कोणत्या पद्धतीने करावे याचे साधे ज्ञान संबंधित अधिकाऱ्यांना किंवा कंत्राटदाराला नाही, की त्यांना कामाच्या दर्जाबद्दल काही सोयरसुतकच नाही?असा प्रश्न या डांबरीकरणाचा दर्जा पाहिल्यानंतर पडतो.एकीकडे पावसाळी वातावरण तयार झाले असताना दुसरीकडे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने या रस्त्याचा दर्जा चांगला राहणार का? असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थित केला आहे. रस्त्याचे काम करताना आधी गिट्टीचा थर व्यवस्थितपणे देऊन नंतरच डांबरीकरण करणे गरजेचे असते. पण तानबोडी ते बोटलाचेरू मार्गावर गिट्टीचा वापर अत्यल्प करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील डांबरीकरण अवघ्या काही दिवसात उखडणार आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी. अशीही मागणी आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी केली आहे.