मेडिगट्टा प्रकल्पातील भूसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढा

57

– आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांची विधानसभेत मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा भागात उभारण्यात आलेल्या मेडिगट्टा सिंचन प्रकल्पातील भूसंपादन व पुनवर्सनाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी वाताहत होत आहे. त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन मेडिगट्टा सिंचन प्रकल्पातील भूसंपादन व पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, अशी मागणी गडचिरोली – चंंद्रपूर वर्धधा क्षेत्राचे विधान परिषद आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नातून केली आहे.
मेडिगट्टा प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा राज्याला जास्तीत जास्त म्हणजे 18 लाख 50 हजार एकर क्षेत्राला सिंचन होणार आहे. त्यामुळे सिरोंचा भागातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी तेलंगणा सरकारची असल्याचा मुद्दा आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी उपस्थित केला आहे.
मेडिगट्टा सिंचन प्रकल्प झाल्यानंतर सिरोंचा परिसरातील लोकांची मोठी वाताहत झाली. भूसंपादन, पुनर्वसन असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न निकाली लावण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस पाऊल उचलले पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना मोबदला अदा करण्याची जबाबदारी तेलंगणा सरकारची आहे. आजमितीस भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. या टप्प्यामध्ये जवळपास 1090 भूधारकांना लाभ मिळाला आहे. संयुक्त मोजणी झालेली परंतु जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही अशी 12 गावे आहेत. या 12 गावांमध्ये जवळपास एकूण 341 भूखंड आहेत आणि भूसंपादित क्षेत्र 116.23 हे. आर. आहे. परंतु आपण घेतलेल्या माहितीनुसार 116 हे. आर. क्षेत्र अजूनही भूसंपादित झालेले नाही. यासंदर्भात तेलंगणा सरकारशी आपला पत्रव्यवहार सुरू आहे. या गंभीर व संवेदनशील प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशीही मागणी विधान परिषद आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान केली आहे.