बदनामी करणाऱ्यांंना १ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस व पोलिसात तक्रार

165

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची पत्रकार परिषदेत माहिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ६ डिसेंबर २०२२ : मेक इन गडचिरोलीच्या नावाने अगरबत्ती क्लस्टर व मत्स्य तलाव यामध्ये फसवणूक केल्याच्या विरोधात ३० नोव्हेंबरपासून नागपूर येथील संविधान चौकात काही लोकांनी उपोषण आंदोलन सुरू भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मेक इन गडचिरोली अंतर्गत फसवणूक केली असे आपल्यावर आरोप करीत आपली बदनामी केलेली आहे. त्यांनी केलेले आरोप खोटे व निराधार असून आपली वारंवार बदनामी करणाऱ्यांना आपण १ कोटीच्या मानहानीची नोटीस व त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली असल्याची माहिती आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आज, ६ डिसेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

न्यायालयामार्फत कारवाई केल्यास माझी बदनामी करण्याचा त्यांचा हेतू सफल होऊ शकत नाही याची त्यांना कल्पना असल्याने माझी वारंवार बदनामी केली जात आहे. त्यांची खरंच मी फसवणूक केली असल्यास त्यांनी माझ्या विरोधात न्यायालयात जावे, उत्कृष्ट वकिलाची स्वतः नेमणूक करावी, त्याकरिता लागणारा खर्च सुद्धा मी देण्यास तयार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी दोषी असल्यास नक्कीच माझ्याविरुध्द कारवाई होईल. मात्र न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग खुला असतानाही प्रकरणाची पूर्ण सत्यता त्यांना माहीत असल्याने तिथे न जाता प्रसार माध्यमातून माझी बदनामी करण्यासाठीच त्यांनी असे मार्ग अवलंबिलेले असल्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही माझ्यावर असे खोटे, निराधार व तथ्यहीन आरोप करण्यात आले असून या आरोपाविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांमार्फत पूर्ण ताकदीनिशी चौकशी होऊन तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे. तथ्य नसल्याबाबतचे सूचनापत्र पोलिसांकडून १७/८/२०२१ रोजी प्रसिद्धही करण्यात आले आहे. तरीही केवळ राजकीय सूडबुद्धीने अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोपही आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी (narendra modi) यांनी ज्याप्रमाणे “मेक इन इंडिया” (make in India) व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (devendra fadanvis) यांनी “मेक इन महाराष्ट्र” (make in maharashtra) ही संकल्पना मांडली. त्याच आधारावर आपण “मेक इन गडचिरोली” ही नवसंकल्पना मांडून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले. मेक इन गडचिरोली ही काही माझी संस्था किंवा संघटना नाही ही केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी मांडलेली एक “नव संकल्पना” आहे. जिल्ह्यात नवीन उद्योग निर्मिती व्हावी याकरिता नवउद्योजकांना प्रेरित करण्यासाठी १ ते ३० जानेवारी २०१७ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात उद्योग क्रांती रथयात्रा काढली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यात १ महिना पूर्णवेळ दौरा करून नव उद्योजकांना प्रोत्साहित केले. यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योगाचे वातावरण निर्माण केले. अनेकांना जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. मध्ये उद्योगासाठी जागा मिळवून दिली. त्यातील काहींचे उद्योग प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळावा याकरिता नविन उद्योजकांना प्रेरित करून अगरबत्ती क्लस्टरची निर्मिती केली. मच्छी पालनासाठी अनेकांना निल क्रांती या शासकीय योजनांमधून लाभ मिळवून दिला. या सर्व योजनांमध्ये मी कुठेही प्रत्यक्षात सहभागी झालो नाही. केवळ शासकीय योजनांचा या नवीन उद्योजकांना व रोजगार घेऊ इच्छिणाऱ्यांना लाभ मिळावा याकरिता आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. याकरिता झालेले सर्व आर्थिक व्यवहार हे जिल्हा उद्योग केंद्र, सरकारी बँका व शासकीय कार्यालय यांच्यामार्फत झालेले असून यामध्ये योजना राबविणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणा आहेत. शासनाचे सर्व नियम पाळून सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे व शासकीय नियमांच्या आधारावर बँकेच्या मार्फत झालेले आहे. सर्व लाभार्थ्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने स्वतः समजून हे उद्योग सुरू केलेले आहेत. यामध्ये ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचे उद्योग अजूनही सुरू असून ते उत्तमपणे चालवीत आहेत. मात्र ज्यांना केवळ यात राजकारण करायचे आहे त्यांनीच आपली फसवणूक झाली, असा कांगावा करीत आहेत. यापूर्वीही त्यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये आपल्या विरोधात तक्रार करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी गडचिरोली पोलिसांंमार्फत अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली. चौकशीअंती सर्व प्रक्रिया शासकीय यंत्रणामार्फत बँकेमार्फत पारदर्शकपणे पडल्याचे सिद्ध झाले. त्यांनी सूचनापत्राद्वारे या सर्व तक्रारकर्त्यांना आपल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही केवळ बदनामीसाठी हे षडयंत्र रचल्या जात असल्याचे आ. डॉ. होळी यांनी म्हटले आहे.

अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा असल्याने व मागील काही दिवसांपूर्वी टीव्हीवर आपले नाव आल्याने विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या बदनामीचे कट कारस्थान सुरू केलेले आहे. परंतु आपली वारंवार होणारी बदनामी आपण सहन करणार नसून यापुढेही अशी बदनामी सुरू राहिल्यास जो आपली बदनाम करेल त्याला त्याचप्रकारे उत्तर दिले जाईल, असा इशाराही पत्रकार परिषदेतून दिला आहे.

या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष योगिताताई भांडेकर, नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा योगिताताई पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, भाजपा गडचिरोली तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहणे, चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, पंचायत समितीचे माजी सभापती विलासजी दशमुखे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्करराव बुरे, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, राजू खंगार, केशव निंबोड आदी उपस्थित होते.