– आरमोरी बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या
– भाजप महिला आघाडीची उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या एक वर्षांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. नुकतेच एटापल्ली तालुक्यातील महिलेवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच आरमोरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार सारखा प्रकार घडला ही निंदनीय बाब असून जिल्ह्यातील सामाजिक संघटनांंनी समोर येवून व पोलीस विभागाने यावर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करून जनजागृती शिबिर, जनजागरण मेळावे तसेच किशोरवयीन युवतीसाठी लैगिंक शिबिराचे आयोजन करून युवती व महिलांचे सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हा संयोजिका तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, जिल्हा सचिव गीताताई हिंगे, जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेवीका वैष्णवीताई नैताम, पायल कोडाप, कोमल बारसागडे, भाजप सोशल मीडिया युवती प्रमुख ईशा फ़ुलबांधे व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या विज्ञान युगात तरुणी आपले गाव सोडून इतरत्र उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात मात्र दुसरीकडे जाऊन शिक्षण घेणाऱ्या युवतीही सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांची सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस विभागाने जनजागृती शिबिर घेऊन युवती व महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने केली आहे. तसेच आरमोरीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी ठोस पुरावे कोर्टात सादर करण्याची मागणी यावेळी महिला आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस विभागाकडे केली आहे.
तसेच जिल्ह्यातील महिलांच्या अडी- अडचणी व समस्या दूर करण्यासाठी व त्याना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक महिन्यातील एक दिवस भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी यांना पोलीस ठाणे किंवा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यलयात चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर व माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व महिला पदाधिकारी यांनी केली असता SDPO यांनी तशा सूचना कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या व अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी तपास करून तसा अहवाल कोर्टात सादर करण्याचे आश्वासन दिले.