विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी जिल्ह्यात ८ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान ‘जल महोत्सव’ साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन पंकज भोयर यांनी दिली.
जल महोत्सवाचा उद्देश पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जल उत्सव संस्थात्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौरऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा आहे.
जल महोत्सव जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. गाव आणि पंचायत समिती स्तरावर जल महोत्सव आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल. गावात ग्रामसभा आणि ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीद्वारे प्रत्यक्ष कृतींवर भर दिला जाणार आहे.
महिलांद्वारे पाणी गुणवत्ता चाचणी (फिल्ड टेस्टिंग किट वापरून) केली जाणार आहे. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता केली जाणार आहे. पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर आणि सामुदायिक शपथ दिली जाणार आहे. जिल्हयातील आदिवासी वाडी-पाड्यांसाठी सौरऊर्जेवर आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. जल महोत्सवाच्या उपक्रमा मागचा उद्देश ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत तसेच सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी आहे.







